E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740
15
January

मकरसंक्रांत – २०१८

मराठी माणूस जगाच्या पाठीवर जाईल तिथे आपली संस्कृती सोबत घेऊन जातो. याच उक्तीला अनुसरून बंगळुरूमध्ये देखील मकरसंक्रांत सण पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमित्त होते मराठी प्रतिष्ठान, बंगळुरू आणि टी-कट्टा ग्रुप, बंगळुरू यांनी आयोजित केलेल्या ‘मकरसंक्रात-२०१८’ या कार्यक्रमाचे. बंगळुरूस्थित १००हून मराठी लोकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रकाश पाटील, निर्मला पाटील, शोभा तळसंदेकर,बापूसाहेब शिंदे, गणेश राऊत व अमित कानडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यानंतर गणेशपूजन व शिव छत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानेश्वर कुंभार, प्रवीण कुरे व मराठी प्रतिष्ठानचे सचिव नंदकुमार स्वामी यांनी केले.

मराठी प्रतिष्ठानचे बापूसाहेब शिंदे व टी-कट्टा क्लबचे इकबाल मुलाणी यांनी जमलेल्या लोकांचे स्वागत केले. इकबाल मुलाणी यांनी मराठी संस्कृती व सण, मकर संक्रात याबद्दल माहिती दिली. दत्ता भगत यांनी आपल्या नयनरम्य रांगोळीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा पवन पाटील यांच्या मंत्रमुग्ध आवाजात ‘माहेरची ओढ’ व ‘भुलले रे मन माझे’ या मराठी गीतांनी झाली. अवघ्या ५ वर्षांच्या कु.ओवी बापूसाहेब शिंदे या चिमुरडीने सादर केलेल्या हूला हू नृत्य प्रकाराने जमलेल्या डोळ्याचे पारणे फेडले. तसेच कु.मृगाक्षी विजय पाटील या ६ वर्षाच्या चिमुरडीने आपल्या नृत्याविष्काराने लोकांची वाह वा मिळवली. अवनी चौगावकार या केवळ ४.५ वर्षाच्या मुलीने देखील नृत्यकौशल्य दाखवत उपस्थितांना आश्चर्याचा गोड धक्का दिला. टी-कट्टाचे हरहुन्नरी कलाकार प्रवीण भरमशेट्टी यांनी आपल्या अप्रतिम नृत्याने वातावरणात जबरदस्त उत्साह फुंकला.

यानंतर लहान मुलांचा बोरन्हाणाचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. या सोबतच जमलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ आयोजित केले होते. उपस्थित सर्व लोकांनी त्यांचा मनमुराद आनंद घेतला. यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला. भोजन अर्थातच अस्सल महाराष्ट्रीय प्रकाराचे होते व जमलेल्या लोकांनीदेखील भारतीय बैठक घालून त्याचा आस्वाद घेतला.

संक्रांत सणाला मराठी स्त्रियांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. या कार्यक्रमातदेखील उपस्थित महिलांनी मराठी परंपरा जपली. महिलांसाठी हळद-कुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम पार पडला. कृपा गणेश राऊत, सोनाली नंदकुमार स्वामी, भाग्यश्री अजय अडसूळ,श्वेता वाणी व रीचा चौगावकर यांनी महिलांच्या या कार्यक्रमाचे छान आयोजन केले. त्यानंतर विविध-कालागुणदर्शन कार्यक्रमांतर्गत रांगोळी, मेंदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटपाचा कार्यक्रम झाला. मराठी प्रतिष्ठानचे गणेश राऊत ,विजय पाटील ,नंदकुमार स्वामी ,बापूसाहेब शिंदे , टी-कट्टाचे इकबाल मुलाणी, प्रवीण कुरे आदींच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश राऊत यांनी आगामी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. नंदकुमार स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अनौपचारिक वातावरण, प्रचंड उत्साह व जमलेल्या सर्व मराठी जनांप्रती अकृत्रिम स्नेहभाव हे या कार्यक्रमाचे एकूणच वैशिष्ट्य सांगता येईल. ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ म्हणत मराठी परंपरा सणांमार्फत जपण्याचा, चिमुरड्यांच्या किलबिलाटातच त्यांना संस्कृती रक्षण व परंपरा जतन करण्याचे धडे देण्याचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी कुटूंबांमधील एकोपा टिकवायचा प्रयत्न या कार्यक्रमात झाला. मराठी प्रतिष्ठान, बंगळुरू हे मंडळ या कामी सतत अग्रेसर असते. बंगळुरूमधील विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी कुटुंबांना एकत्र आणून या पद्धतीच्या कार्यक्रमांमार्फत त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करण्याचे मोठे कार्य मराठी प्रतिष्ठान नेहमीच करत असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात हे क्षण निश्चितच वर्षभराची ऊर्जा व आनंद देऊन जातात.

या कार्यक्रमाला टी-कट्टा ग्रुपच्या सर्व महिला, इकबाल पठाण, प्रवीण कुरे, महेंद्र सांडभोर, प्रवीण भरमशेट्टी इ. तसेच मराठी प्रतिष्ठान बंगळुरूचे अजय अडसूळ, विजय पाटील, नंदकुमार स्वामी, गणेश राऊत, अर्चना पाटील, प्राची दीक्षित, निलेश राणे, बापूसाहेब शिंदे, भाग्यश्री अडसुळ,कृपा राऊत,सोनाली स्वामी,श्वेता वाणी व रिचा चौगावकर आदींचे मोलाचे योगदान लाभले.

Venue

Bangalore, Karnataka

Details

Date:
January 15, 2018