मातृभाषा कोणतीही असो पण ती त्या व्यक्तीची स्वत:ची खरी ओळख असते आणि त्यामुळे ती त्याची स्वत:ची शक्तीही बनते. याच धरतीवर प्रत्येक मराठी पालक आपल्या मुलांना मराठी लिहायला, अस्खलित बोलायला शिकवायचा विचार करतो. आम्ही सध्या बंगलोरवासी आहोत. आमची सर्वांची शिक्षणे महाराष्ट्रातच झाली. महाराष्ट्रात वाढलो. नोकरी निमित्त इथे आलो आणि इथलेच झालो. आमच्या मुलांच्या शाळाही इथेच सुरु झाल्या. मुलं इथे शाळेत रमायला लागली. परदेशी भाषा बोलायला लागली. जशी प्रत्येकाची मुले मोठी होऊ लागली तेव्हा मग मनात एक सल येत असे की आपण आपल्या मुलांना फ्रेंच जर्मन शिकवू कारण ते शाळॆत शिकवले जाते मग कधी मराठी लिखाण जमेल? मराठी कविता येतील? कधी आजी आजोबांशी अस्खलीत मराठीत गमतीदार किस्से बनवता येतील? हे आणि असे अनेक प्रश्न पडायचे. ज्या मातृभाषेच्या जोरावर आपण आज जग जिंकत आहोत त्याच मातृभाषेपासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवतोय. मुलांना मराठी बोलता येत नाही असे नाही पण मग ते पु.ल. कधी मनापासून वाचणार? कुसुमाग्रजांच्या कविता कश्या म्हणणार? आणि शिवाजी महाराजांचे पोवाडे म्हणजे काय असे विचारणार नाहीत ना? आपली मुले या ग्रंथसंपदेला पारखी राहणार नाहीत ना? एक ना धड भरपूर प्रश्न. अशी खूप मराठी कुटुंबे बंगलोरमध्ये आहेत.
त्यातच हा लॉकडाऊनचा काळ सुरु झाला. करोनामुळे अगोदर सगळेच अस्थिर होते पण जसे सगळे शांत व्हायला लागले तसे मराठी प्रतिष्ठान बंगळूरुने (MPB) ऑनलाईन मैफिली सुरु केल्या त्यात वेगवेगळे विचार, विषय माडले जाऊ लागले. आरोग्य ते विनोद आणि गाण्याच्या मैफिली सुरु झाल्या पहिले दोन महिने त्यात जात असतानाच MPB चे उपाध्यक्ष मा.बापूसाहेब शिंदे यांनी मराठी शाळा ही कल्पना मांडली. या विचारांना एक दिशा मिळत गेली आणि मग आम्ही स्वत:च स्वत:ची मदत करायचे ठरवले. एकमताने या कल्पनेला संमती मिळाली आणि आपली “ओळख मायबोलीची” अशी मराठी ऑनलाईन शाळा सुरु केली. फेसबुक ग्रुपमध्ये शाळा सुरु करत आहोत असा एक प्रस्ताव टाकला आणि अवघ्या दोन दिवसात विविध वयोगटातले विविध देशांतून ५२ विद्यार्थी दाखल ही झाले.काही विद्यार्थी अमेरीका, जपान वरून आपल्या ह्या शाळेत आज शिकत आहेत.ही शाळा ऑनलाईन असल्याने आता सोप्पे झाले होते. त्याचसोबत ऐच्छिक पद्धतीने शिक्षकही आले. कोणत्याही शिक्षकाला आर्थिक बाब मध्ये नसतानाही शिकवायची इच्छा आहे.
इथे शिक्षकांचे विशेष कौतुक वाटते त्यामुळे सर्वांची नावे इथे नमूद करावीशी वाटतात. अंजनी राणे, मनाली जोशी, स्मिता बर्वे, संजीवनी अहेरराव, स्मिता ढोले, राकेश शेटे, आणि वैद्या सविता कालगांवकर यांचे विद्यादानाचे कौतुक करावे तितके कमी आहे. स्वत:च्या कामातून तसेच संसारातून वेळ काढून ते विद्यादानाचे काम अगदी उत्तम पद्धतीने करीत आहेत. अभ्यासक्रम तयार करण्यापासून वयोगटानुसार शिक्षकांनी वर्ग वाटून घेतले आणि ही शाळा “गुरुपौर्णिमेला” ५ जुलै २०२०ला सुरु झाली. त्यात आम्ही मराठी स्वर-व्यंजन ही मूळाक्षरे तसेच बाराखडी पासून सुविचार, उच्चारण, वक्तृत्व, बोधकथा, गमतीदार कोडी आणि अंकगणित, पूर्णांक संख्या, अक्षरांत लिहिणे, बोलणे तसेच रंग, व तत्सम सामान्य ज्ञान असा सगळा अभ्यासक्रम घेत आहोत. दर शनिवार आणि रविवार वयोगटानुसार छोटा वयोगट, मध्यम दोन गट आणि मोठा एक गट असे चार वर्ग भरतात. प्रत्येक वयोगटाची कुवत पाहून त्यांच्या अभ्यासक्रमात गरजेचा बदल केला गेला आहे.
आम्ही जेव्हा अभ्यासक्रम ठरवला तेव्हा तीन महिने हा कालावधी ठरवला गेला. त्यात स्वातंत्र्यदिन समावि्ष्ट होताच. तेव्हाच ठरले की हा स्वातंत्र्यदिन मुले अगदी महाराष्ट्रात साजरा होतो तसाच मराठी देशभक्तीपर गीत गाऊन, प्रतिज्ञा म्हणूनच साजरा करतील. त्यानुसारच पहिल्यापासून प्रत्येक वर्गात तयारीही सुरु झाली आणि भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन बंगलोरमध्ये मराठी शाळेत अगदी मराठमोळ्या प्रकारे साजरा झाला.ह्या साऱ्यात एम पी बी सदस्यांसोबतच मंडळाचे माजी अध्यक्ष.मा. गणेश राऊत यांचा मोलाचा सहभाग असतो.ह्या साऱ्या वर्गांचे व्हीडीओ आम्ही आमच्या युटुब चॅनेलला उपलब्द केले आहेत ज्याने इतर मुलांना फायदा होईल.
मराठी प्रतिष्ठान बंगळूरु बद्दल
मराठी प्रतिष्ठान बेंगलूरू हे एक रजिस्टर्ड मंडळ आहे. ते २०१७ मध्ये स्थापित झालेले असून तेव्हा पासून मराठी माणसासाठी प्रत्येक गरजेसाठी तत्पर आहे.मराठी सणवार, गाठी भेटी, मनोरंजनासाठी महाराष्ट्रातून नाटक आणणे, नृत्यस्पर्धा,खेळ यांचे आयोजन करणे, सामाजिक कार्यात हातभार लावणे इ.डिसेंबर २०१९ मध्ये जगावर करोनाचे संकट आले तेव्हा बरेच कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने घेणे सुरु केले. आमचे स्वयंसेवक या शाळेसाठी मनापासून कार्यरत आहेत.
मराठी माणसासाठी मह्राराष्ट्राबाहेर सतत मदतीसाठी तयार.. मराठी प्रतिष्ठान बंगळुरू (MPB)