मराठी प्रतिष्ठान बेंगळूरु संचालित, ‘ओळख मायबोलीची’ या ऑनलाईन मराठी शाळेने 15 ऑगस्टला ऑनलाईन स्वातंत्र्य दिन साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात ऑनलाईन झेंडावंदन आणि राष्ट्रगीत म्हणून झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून, सादरीकरणाला सुरुवात झाली.
एवढ्या लहान मुलांना आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम आणि आपुलकी बघून मन सुखावले. कोणी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलले तर कोणी भारतमातेचे मनोगत व्यक्त केले. मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली तेव्हा तर देशाबद्दलचा अभिमान बघून खूप कौतुक वाटले.
कोणी आपल्या नृत्यातून तर कोणी आपल्या पारंपरिक संरक्षण कलेतून आपले देशप्रेम व्यक्त केले. एका चिमुरडीने आपल्या वेषभूषेतून भ्याड अतिरेकी हल्ल्याला दिलेले चोख उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ या घटनेचे सादरीकरण केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली कशी आणि कुठल्या क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे, ह्यावर आधारीत मनोरंजनात्मक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, अशी इच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.