मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरीही आपली परंपरा विसरत नाही. अगदी कुठल्याही व्यवसायात कितीही व्यस्त असला तरी मराठमोळे सण आणि परंपरा यांचा विसर पडू देत नाही. बंगळुरू येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला मराठी समाज देखील याबाबत मागे नाही. येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी जनांचे ऐक्य व संघटन साधणारी संघटना ‘मराठी प्रतिष्ठान बंगलुरू’ या संघटनेने वटपौर्णिमे निमित्त आयोजित केलेला “सखा सोबती वट पौर्णिमा २०१८” हा कार्यक्रम ३० जुन २०१८ रोजी पार पडला. बंगळुरूतील कबन पार्क इथे आयोजित या कार्यक्रमात बंगळुरुस्थित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश मराठी कुटुंबांनी उत्साहात भाग घेतला.
भारतीय सण व परंपरा या मुख्यत्वे पर्यावरणाशी जोडल्या गेल्या आहेत. सण साजरा करण्यासोबतच या सणांचे विज्ञान समजून घेणे हे देखील महत्वाचे आहे; नेमकी हीच गरज ओळखून वट पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मराठी प्रतिष्ठानने कल्पकतेने इतरही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात dailydump.org या पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या श्री. राहुल यांच्या व्याख्यानाने झाली. श्री. राहुल यांनी पर्यावरण व शहरी कचरा व्यवस्थापनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. घरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक व सोप्या पद्धतीने कशी विल्हेवाट लावता येईल हे त्यांनी श्रोत्यांना समजावून दिले.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी करताना अनेकांना स्वतःच्या आरोग्य विषयक समस्या उद्भवत असतात. कामाच्या निश्चित वेळा नसल्याने आरोग्य समस्या अनेकदा दुर्लक्षिल्या जातात. आयुर्वेदीक जीवनशैलीचा अवलंब केल्यास बहुतांशी आजार कशा प्रकारे दूर ठेवता येतील, याविषयी डॉ. मुग्धा कुलकर्णी यांनी अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. शारीरिक आजारांसोबतच मानसिक आजार वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचे महत्व त्यांनी विशद केले. रोजच्या कामातून येणार मानसिक ताण दूर करणे तसेच लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे याविषयी देखील डॉ. मुग्धा कुलकर्णी यांनी श्रोत्यांना सल्ले दिले.
वटपौर्णिमा हा सण मुख्यत्वाने स्त्रीयांचा सण असतो. पूर्वी स्त्रियांना रोजच्या जीवनातून दोन क्षण विरंगुळ्याचे अनुभवता यावेत, याकरिता स्त्रियांना सणांच्या निमित्ताने इतर स्त्रियांशी हितगुज करता येई. गाणी, भोंडला, झोका खेळणे यातून मनोरंजन मिळे. मराठी प्रतिष्ठानने याला आधुनिक जोड देऊन पुरुषांना देखील संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी दिली. पुरुषांनी देखील हिरहिरीने भाग घेत या संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली. नवीन व जुन्या मराठी कुटुंबाचा परिचय कार्यक्रम घेऊन त्यांना कुटुंबात सामावून घेतले. पारंपरिक कार्यक्रमासोबतच आयोजकांनी विविध गमतीदार खेळांचेही आयोजन केले होते. या खेळांनी उपस्थित सर्वांचेच मनोरंजन केले. चविष्ट अल्पोपहाराने उपस्थितांची पोटासोबत मने देखील जिंकली!
आधुनिक जीवनशैलीचा अवलंब करताना मूळ मराठी मातीशी नाळ तुटू नये याकरिता मराठी प्रतिष्ठान बंगळुरू हे कायमच प्रयत्नशील असते. विविध मराठी सण सामूहिकरीत्या साजरे करून परमुलूखात एक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन मराठी प्रतिष्ठान करून देत असते. वटपौर्णिमा 2018 या कार्यक्रमाच्या आयोजनात मराठी प्रतिष्ठानच्या महिला समितीच्या सभासद सौ.अनघा मसने, सौ.भाग्यश्री अडसूळ, सौ.श्रीजला जोशी, सौ.सुप्रिया कुऱ्हाडे यांचे मोलाचे नियोजन व सहकार्य लाभले.तसेच ह्मा कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे श्री. गणेश राऊत, श्री. नंदकुमार स्वामी, श्री.विजय पाटील, श्री. बापूसाहेब शिंदे, श्री. राहुल निंबाळकर, श्री. निलेश राणे, श्री. शैलेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याकामी प्रतिष्ठानच्या तरुण शिलेदारांना ज्येष्ठांचे देखील मार्गदर्शन मिळत असते. श्री.सुनील खंडाळकर, श्री.प्रसन्नकुमार कंन्नव, श्री.व सौ.निर्मला सोनवणे, सौ.शोभा तळसंदेकर, सौ.निर्मला पाटील वैजयंती मनगुली, व विद्याधर चिंचवाडे आदी ज्येष्ठ मंडळींनी देखील आपली उपस्थिती दर्शवत आशीर्वाद दिले.