दिवाळीचे औचित्य साधून २२ ऑक्टोबर २०१७ रोजी “दीपोत्सव २०१७” या कार्यक्रमाचे आयोजन केले. चविष्ट फराळासोबतच रांगोळी स्पर्धा, दिवे पेंटिंग, ग्रीटिंग कार्ड बनवणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. आपल्यासाठी सीमेवरती लढणाऱ्या सैनिक बंधू-भगिनी बद्दल प्रेम व आदर दाखवत दीपोत्सव स्पर्धेत तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्स सैनिकांना दिवाळी व नवीन वर्षाचे संदेश देत भेट म्हणून पाठवून देण्यात आले. या उपक्रमाबद्दल त्यांची मिळालेली पोचपावती आम्हाला भारावून टाकणारी होती.
“मराठी प्रतिष्ठान” केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी मंडळाने एक पाऊल पुढे टाकलं. सणवार साजरे करत असताना आपण सामाजिक भान बाळगलं पााहिजे ही जाणीव सर्वव सभासदांच्या मनात होती.याच प्रेरणेतून आमचे मित्र हर्षद दाणी यांच्या माध्यमातून कोल्हापूर स्थित “लोरिमा” ह्या अनाथ मुलांची देखभाल करणाऱ्या संस्थेला मदत करण्याचं ठरवलं. संस्थेतील चिमुकल्यांना दिवाळीनिमित्त खाऊ, वह्यापुस्तके इ. वाटपासाठी मराठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वेच्छेने निधी जमा करून उपक्रमासाठी खारीचा वाटा उचलला. शिवाय, दरवर्षी मंडळाकडून अशा प्रकारे मदत वाढत राहील ह्याची जबाबदारी सुद्धा घेतली.