बंगळुरूमधील ‘मराठी प्रतिष्ठान’ या संघटनेने आपल्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला आहे! मराठी प्रतिष्ठान बंगळुरूस्थित मराठीजणांसाठी दर वेळी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करत असतेच. मात्र यावेळी आयोजित भव्यदिव्य सोहळ्याने प्रतिष्ठानशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ झाली आहे. निमित्त होते सुप्रसिद्ध मराठी कलाकार संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडन ला’ या विख्यात नाटकाचे. बंगळुरूमधील संपूर्ण कलावर्तुळात प्रतिष्ठानच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी मराठी भाषा, संस्कृती आणि कला यांच्याशी नाळ तुटू देत नाही, याचाही पुनर्रप्रत्यय यावेळी आला.
नाटक म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा आवडीचा कोपरा असतो. त्यात वऱ्हाड ही कै. लक्ष्मण देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून आणि सादरीकरणातून अजरामर केलेली कलाकृती आहे. या नाटकाविषयी माहिती नसणारा मराठी माणूस या जगात अगदीच विरळा! केवळ मराठीच नव्हे तर भारतीय साहित्यसृष्टीतील ही एक अप्रतिम कलाकृती मनाली जाते. कै. लक्षण देशपांडे यांच्या निधनानंतर संदीप पाठक या कलाकाराने या नाटकाच्या सादरीकरणाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. अर्थात त्यांनी ती यशस्वी देखील करून दाखवली. बंगळुरूसारख्या शहरात त्यांच्या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद याचे द्योतक आहे.
मराठी प्रतिष्ठान, बंगळुरू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले खरे, मात्र अशा प्रकारच्या नाटकांचे आयोजन करणे म्हणजे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे बंगळुरू मधील सुप्रसिद्ध एम. एल. आर. कन्व्हेन्शन सेंटर इथे हे नाटक आयोजित करण्याचे ठरले. बंगळुरूमधील हे नाट्यगृह भारतीयच नव्हे, जागतिक रंगभूमीवरील कलाकारांनी नावाजलेले आहे. अतिशय भव्य या नाट्यगृहाला भव्य इतिहास आहे. मराठी प्रतिष्ठानला इतक्या मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनांचा अनुभव नव्हता. इतक्या भव्य नाट्यगृहात मराठी नाटकाला प्रेक्षक संख्या असून असून किती असेल? त्यातुनही जर प्रेक्षक आलेच नाही तर सगळंच खेळ आटोपला असता. मात्र कोणत्याही परिस्थितीत याच एम. एल. आर. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘वऱ्हाड’चा प्रयोग व्हावा यासाठी प्रतिष्ठानचे शिलेदार आग्रही होते. कारण विषय मराठी भाषेच्या प्रतिष्ठेचा होता. यातूनच प्रतिष्ठानच्या बापूसाहेब शिंदे, गणेश राऊत, विजय पाटील आणि नंदकुमार स्वामी यांनी या हट्टाला अक्षरशः चळवळीचे स्वरूप दिले आणि यशस्वी देखील करून दाखवला.
सामान्यतः कलाकार स्वतःच्या तारखा देतात आणि आयोजक या तारखांनुसार नाट्यगृहाचे बुकिंग करतात. त्याप्रमाणे रविवार, दिनांक 9 सप्टेंबर ही प्रयोगासाठी तारीख मुक्रर करण्यात आली. एम एल आर कन्वेशन सेंटर यांनीदेखील दिलदारपणे ही तारीख स्वीकारली. इथंपर्यन्त सर्व काही आलबेल होते. पुढे मात्र आयोजनांचा मुख्य प्रश्न आ वासून होता. कुठलाही प्रायोजक मिळेनासा झाला, तेव्हा सरळ सरळ तिकीट लावून नाटकाचा प्रयोग करायचा ठरले. इथे मराठी माणसाचे नाट्यप्रेम पणाला लावले गेले होते. प्रयोजकाचा प्रश्न तात्पुरता सुटला.
तरीही इतर अनेक अडचणी होत्याच. प्रतिष्ठानने याआधी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असले तरीही त्यांचे स्वरूप हे अगदीच अनौपचारिक असे. या नाट्यगृहात तसे करून चालणारे नव्हते. त्यामुळे पाहुण्यांच्या व्यवस्थेपासून सूत्रसंचालन, उदघाटन, आभार प्रदर्शन, खानपान व्यवस्था या साऱ्याच आघाड्यांवर प्रतिष्ठानचा अनुभव अतिशय तोकडा होता. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश राऊत सांगतात, ” दोन महिने प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अक्षरशः रात्रंदिवस झटत होते. अनेक बहाद्दरांनी तर नोकरी, कुटुंब सांभाळत (दुर्लक्ष हा शब्द अधिक योग्य ठरेल) नियोजन, भेटीगाठी, जाहिरात, कार्यक्रमाची प्रसिद्धी, निधी यावर मेहनत घेतली. संजीव केसकर सर, माणिकताई, रेखाताई, कात्रेश्वर, टी-कट्टा ग्रुप, वाय. एस. ग्रुप या मंडळींनी त्यांना जमेल तशी मदत केली. तरीही धाकधूक होतीच.
परंतु, जसे जसे नियोजन होत गेले, तसा आमचाही आत्मविश्वास वाढीस लागला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेची आम्हालाही खात्री वाटू लागली. आम्ही शक्य तिथे कार्यक्रमाची प्रसिद्धी करायला सुरुवात केली. यासाठी लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी तर घेतल्याच, त्याच बरोबरीने फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर केला. अगदीच गंमत म्हणजे मंडळाच्या बापुसाहेब शिंदे यांनी तर दोन महीने आपल्या गाडीवर जाहीरात लावुन पुर्ण बेगलोरभर भ्रमंती केली व जेव्हा संदिप पाठक यांनी ते पाहिले तेव्हा ते भाराऊन गेले. संदिप पाठकसारखा मोठा कलाकार जो सोशल मीडियामधूनच संपर्कात आला होता, त्यांनीही सोशल मीडियातून प्रसिद्धीसाठी मदत केली. आमच्या मराठी प्रतिष्ठानचे राहुल निंबाळकर,संजय टेंगिनकिरे, निलेश राणे ,विपुल चिंचवडे, प्रदीप पाटील, संतोष गेंगे, युवराज पाटील, राहुल कुरुंदवडे, अश्विन पाटील, वाहिद गडकरी, अनिलकुमार सरदेसाई या मंडळींनी स्वखुशीने मदतीचा हात पुढे केला. लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यांबद्दल कायम कृतज्ञता राहील.”
या नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने मराठी प्रतिष्ठानचे आत्तापर्यंतचे कार्य जगासमोर येणार होते. प्रतिष्ठानसाठी ही एक मोठी पर्वणी होती. या कार्यक्रमानिमित्ताने अधिकाधिक मराठी कुटुंबांना जोडल्या जाण्याची सुवर्णसंधी होती. प्रतिष्ठानचा इतिहास आणि वर्तमान बंगळुरूकरांसमोर सादर करण्याची जबाबदारी सौ. सुप्रिया कुराडे यांनी अतिशय लीलया पेलली. त्यांच्या सादरीकरणाचे दस्तुरखुद्द संदीप पाठक यांनी देखील कौतुक केले. गंमत म्हणजे सुप्रिया ताईनी या आधी कधीही व्यासपीठावर भाषण, सूत्रसंचालन केले नव्हते. या ताईंची कामाची तडफ इतकी की शनिवारी रात्री बारा वाजेपर्यन्त संदीप पाठकांच्या विनंतीवरून ताई अनौपचारिक कार्यक्रमाला हजर होत्या. त्यानंतर रविवारी पहाटे पाच वाजता या ताई बंगळुरू फुलबाजारात फुले घेण्यासाठी गेल्या आणि प्रयोगाचा नारळ फुटायच्या आधी म्हणजे 11वाजता या ताईंनी व्यासपीठावरील फुलांची सजावट आणि रांगोळीने वातावरण भारून टाकले होते!
इतक्या सगळ्या धामधुमीनंतर अखेर रविवार, दिनांक 9 सप्टेंबर, सकाळी 11 वाजता तो ऐतिहासिक क्षण उजाडला. एम. एल. आर. कन्व्हेन्शन सेंटर या भव्य नाट्यगृहात जिथे अल्काझी, नसरुद्दीन शाह, के के मेनन या नामवंत कलाकारांचे नाट्यप्रयोग झाले होते. तिथे आज एका मराठी नाटकाच्या प्रयोगाला हाऊसफुलची पाटी लागली होती. बंगळुरूच्या इतिहासात पहिल्यांदाच बेंगळुरू मध्ये ह्या मराठी नाटकाला हाऊसफुलची पाटी लागली होती. अतिशय अभूतपूर्व असा हा क्षण होता. समस्त बंगळूरकर मराठी जणांना अभिमान वाटावा असा क्षण होता. मराठी प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गेल्या दोन महिन्यात केलेल्या कष्टांचे चीज झाले होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर हा आनंद दिसत होता. मराठी माणूस एकत्र यावा, त्यांच्यातला एकोपा निरंतर टिकून रहावा यासाठी जी धडपड होती, ती अर्थातच सार्थ ठरली. उत्साह दुणावलेल्या संदीप पाठकांनी नाटकात अक्षरशः कमाल केली. आपल्या जिवंत अभिनयाने आणि अचूक टायमिंगने त्यांनी नाटक गाजवले आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांचे हास्यस्फोट आणि दिलदारपणे दिलेली दाद ही अभिनयाला मिळालेली पावती होती.
संदीप पाठक या कलाकाराविषयी अधिक सांगणे अगत्याचे ठरेल. सामान्यतः कलाकार माणूस म्हटला की अतिशय शिष्ठ, स्वतःच्या तोऱ्यात वावरणारा आणि समोरील व्यक्तीला तुच्छ समजणारा असे एक सर्वसामान्य चित्र आहे, अगदी याच्या उलट संदीप पाठक हा कलाकार आहे. अतिशय विनम्र, निगर्वी, हा मनुष्य स्वतः हालअपेष्टा सोसतो मात्र प्रेक्षक आणि आयोजक दोघांची गैरसोय होऊ देत नाही. आयोजकांमध्ये हा कलाकार इतक्या बेमालूमपणे मिसळतो की जणू त्यांचा मित्र वाटावा.
नाटकाच्या आदल्या रात्री एक अनौपचारिक गप्पा गोष्टींचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात यांनी इतक्या सहजतेने गप्पा मारल्या की उपास्थितांना अजिबात त्यांच्या वलयाची अजिबात जाणीव होऊ दिली नाही. याच कार्यक्रमाच्या आधी सहज बंगळुरूमधील इस्कॉन मंदिरात भेट दिली. तिथून परतताना बंगळुरूच्या ट्राफिक जामचा फटका त्यांनाही बसला. तिकडे लोक आपली वाट पाहत आहेत या जाणिवेने त्यांनी पुढचा प्रवास चक्क दुचाकीने केला.
प्रयोगाच्या आदल्या रात्री आयोजकांनी प्रयोग हाऊसफुल असल्याची बातमी त्यांच्या कानावर घातली. त्याबरोबर त्यांनी हाऊसफुलच्या पाटीचा आग्रह धरला. “माझ्यासाठी नव्हे, तुम्हा आयोजकांचे कष्ट मला जगासमोर आणायचे आहेत. त्याकरिता ही हाऊसफुलची पाटी मला हवीय!” ही प्रामाणिक भावना त्यांनी बोलून देखील दाखवली.
मराठी प्रतिष्ठान बंगळुरूचे अनेक कार्यकर्ते याकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये झटत होते. यात मराठी रणरागिणी देखील अजिबात मागे नव्हत्या. भाग्यश्री अडसूळ, श्रीजला जोशी, अनघा मसने व पल्लवी पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. एकंदरीत बंगळूरस्थित मराठीजणांच्या कायमस्वरूपी स्मरणात हा “हाऊसफुल वऱ्हाड निघालय लंडनला” चा प्रयोग राहील, यात शंका नाही!